Sonntag, 7. Februar 2010

दर्जेदार मराठी चित्रपटांचा मेवा

गेल्या काही महिन्यात प्रदर्शित झालेले मराठी चित्रपट पाहिले. नटरंग, हरिश्चंद्रची फॅक्टरी, झेंडा अशी काही दमदार नावे. अनेक जण आपले आपले विश्लेशण देत असतात मी ही ठरवले आपले स्वतां:चे मत द्यावे व ब्लॉग लिखाण करायचे ठरवले.

हरिश्चंद्रची फॅक्टरी
या चित्रपटाची ओळख झाली ते प्रदर्शना आगोदरच ऑस्करला निवडला गेल्याने. चित्रपटाचा जाहिरातीचा मोठा खर्च वाचला, पेपरामधून कौतुकाने या चित्रपटाचे चांगलेच उखळ पांढरे केले. या चित्रपटाचे एक समाधान वाटले. ते म्हणजे प्रथमच मराठी चित्रपटाची जाहिरात इंग्रजी व हिंदी चॅनेलवर दाखवले गेली. परंतु या चित्रपटाची एक गोची केली ती म्हणजे या पॉजिटीव्ह जाहिरातीने या चित्रपटाची आपेक्षा फारच वाढवली. चित्रपटाच्या सुरुवातीला ही आपेक्षा फारच त्रासदायक वाटते. आपण चित्रपट पहायला सुरुवात करतो ते दमदार कथा, संवाद, सडेतोड अभिनय पहायला मिळेल या आपेक्षेने, पण जॉली स्वाभावाची फाळके फॅमिली हे सगळे अंदाज चुकवतात. शोएब अख्तरच्या बाउन्सरच्या ऐवजी राहुल द्रवीडने टाकलेला बॉल खेळायला मिळाला असे सुरुवातीला वाटले. परंतु चित्रपट पहाता पहाता या सहज अभिनयातच चित्रपटाचे सामर्थ्य दडलेले आहे हे कळाले. तो पहिला चित्रपट बनवायला सोसाव्या लागलेल्या हाल आपेष्टा दिग्दर्शकाने एका सहजसुंदर पद्दतीने मांडलेल्या आहेत. एका महान निर्मितीचा प्रवास एका नवीन निर्मिती शैलीत मांडून या नवीन दिग्दर्शकाने आपले टॅलेंट दाखवले आहे. कथानकावर चित्रपटाला १०० टक्के गुण, दिग्दर्शनालाही १०० टक्के गुण, फक्त १९१० दशकातील वातवरण निर्मितीत चित्रपट बराच कमकुवत वाटतो. कलाकारांना एकदम पांढरे शुभ्र कपडे, युरोपीय लोकांचे कपडे, ट्राम, मुंबईतील गर्दी, वेश्यावस्ती या सर्व गोष्टीत १९१० चे दशक शोधायला कष्ट पडतात व ऑस्करला याच तांत्रिक गोष्टींची शहनिशा जास्त होते आणि खासकरुन ऐतिहासिक चित्रपट असेल तर जास्तीच होते. त्यामुळॅ ऑस्करची फेरी चुकली. ते असोत चित्रपट मेसेज जबरदस्त देतो. मानवी मूल्ये जपवणुकीची शिकवण तसेच नैतिकता राष्ट्रवाद यांची छानशी सांगड पहावयास मिळते. लहानमुलांना थिएटरमध्ये जाउन दाखवण्यासारखा चित्रपट.

झेंडा
अवधूत गुप्ते निर्मिती या चित्रपटाची प्रदर्शनाआगोदर बरीच चर्चा झाली ती मनसे व शिवसेनेच्या विरोधाने व नंतर नारायण राणेंच्या विरोधाने. परंतु नंतर या राजकारण्यांनी विरोध मागे घेत प्रदर्शनास गरजेचे नसलेले ना-हरकत प्रमाणपत्र मिळवले व एकदाचा चित्रपट झाला. चित्रपट बनवण्यास अवधूत गुप्ते यांचे मनापासून आभार. जी हिंमत गुप्त्यांनी दाखवली त्यासाठी खरोखर दाद जितकी द्यावी तितकी कमी वाटते. शिवसेना मनसे सारखे धुडगुस घालणारे पक्षांवर सरळसरळ शरसंधान केलेले आहे.आजवर माझ्या पाहणीत तरी कोणताही चित्रपट नाही ज्यात संपूर्ण पक्षावर असे सरळसरळ टार्गेट केले असेल. मस्तवाल काही न करता जिंकणारा काँग्रेस, गुंड राजद, नक्षलींच्या आडून वार करणारे मार्क्सवादी/माओवादी, आयडिओलॉजी चुकलेले समाजवादी, राज्य टिकवायची अक्कल नसलेले भाजप व बकासूर बसपा अश्या सर्वच निर्लज्ज पक्षांवर काही ना काही नक्कीच काढता येईल. विषय चिक्कार आहेत पण हिंमत दाखवली फक्त अवधूत गुप्तेंनी. यासाठी अनेक धन्यवाद. चित्रपटाचा स्ट्राँग पाईंट हा कथानक व वेग हा आहे, चित्रपटात कुठेही बोअर होत नाही. नवीन पक्षाच्या स्थापने मुळे कार्यकर्त्याची होणारी घालमेल हा चित्रपटाचा गाभा आहे व शेवटपर्यंत हा फोकस जसाच्या तसा ठेवला आहे. त्यामुळे चित्रपट राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना जबरदस्त मेसेज देतो. म्युझिक हा चित्रपटाचा स्ट्राँग पॉईंट आहे. गाण्यांनी चित्रपटाला एकदम परिपूर्ण बनवले आहे. नेत्यांवर उडवलेला चिखल थोडा खटकतो. तसेच दोन्ही पक्षांचे प्रमुख (चुलते) विअर्ड दाखवले आहे. परंतु चित्रपटाचे फ्रिडम मान्य केल्यास हा प्रवास सहज होतो. मराठी चित्रपट एका छान चित्रपटाची भर.

नटरंग
७० च्या दशकात तमाशावर आधारित चित्रपटांनी मराठीत धुमाकूळ घातला होता. मी हेच चित्रपट टिव्ही वर पाहून मोठा झालो. कधी तमाशाचा फड पाहिला नाही पण बरेच तमाशाचे चित्रपट आपसूकच बघितले गेले. त्या दिवसांची आठवण करुन देणारा हा नटरंग चित्रपट एखादी जुनी आठवण रिफ्रेश करुन जातो. दिग्दर्शकाने कांदबरीवर आधारित चित्रपट काढून एक चांगला प्रयत्न केला आहे. या चित्रपटाला दुसरे नाव देता आले असते अतुल कुलकर्णी. खरोखरच नाच्या उभा करताना अतुल ने दिलेला परफॉरमन्स जबरदस्त आहे. त्याचे तमाशावरील वेड, या छंदातच करिअर शोधणारा गुणा, पण या प्रयत्नातच नाच्या म्हणून काम करण्याची आलेली वेळ. त्याचा पैलवानापासून नाच्या झालेला प्रवास व नाच्याचा अभिनय करताना पुरुषार्थ दाखवण्याची त्याची धडपड हे साकार करतान अतुलने खरोखरच वेड लावले आहे. पैलवानाला साजेशी शरीर यष्टी व नंतर नाच्याला साजेशी शरीरयष्टी हे सगळेच अफलातून आहे. तसेच लहानसहान घटनांमधून तमाशाचा धंदा करताना येणार्‍या अडचणी छान पद्धतीने दाखवल्या आहेत. एकंदरीतच एक पॉवरफूल दर्जेदार मराठी चित्रपट.